शामली : शामलीमधील अप्पर दोआब साखर कारखान्यातील टर्बाइनच्या जॉईंटमध्ये स्फोट झाला. त्यामुळे टर्बाइन जवळील कामगार गंभीर जखमी झाला. त्याला कर्नाल येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. साखर कारखान्यातील ऊस गाळप बंद करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. कामगार जेव्हा ऊसाचे गाळप करीत होते, तेव्हा टर्बाइनच्या ज्वाइंटमध्ये स्फोट झाला. यादरम्यान तेथे बनत गावातील कबाडी हा कर्मचारी काम करत होता. त्याला आगीच्या ज्वाळांनी वेढले. इतर कामगारांनी त्याला वाचवून उपचारासाठी पाठवले.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याचे सहायक महाव्यवस्थापक दीपक राणा यांनी सांगितले की, टर्बाइनचा जोड तुटल्याने हा अपघात घडला. जखमी कामगारावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ऊस गाळप बंद झाल्याने कारखाना परिसरात आणि ऊस खरेदी केंद्रांवर ऊस घेवून आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. साखर कारखान्याच्या केन यार्डमध्ये वाहनांना थांबविण्यात आले आहे. मात्र, नंतर कारखाना परिसरातही ऊसाने भरलेल्या गाड्या दिसून येत होत्या.