कुशीनगर : बंद असलेल्या छितौनी साखर कारखान्यांतून लोखंड आणि तांबे चोरणाऱ्या दोघांना हनुमानगंज पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल करुन दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली. दोघेही नजिकच्या जनपद महाराजगंज येथील रहिवासी आहेत.
पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक ज्ञानेंद्र कुमार राय यांनी सांगितले की, ते सहकाऱ्यांसमवेत रात्री १० वाजता गस्त घालत असताना छितौनी साखर कारखान्याच्या परिसरात त्यांना हालचाली दिसल्या. एका गाडीवर दोघेजण पोते ठेवताना आढळले. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर दोघेही घाबरले. तपासणी केल्यानंतर पोत्यामध्ये घातलेले लोखंड, तांबे आदी साहित्य सापडले. अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला.
कारखान्यातून लोखंड आणि तांबे चोरून विकण्यासाठी नेत असल्याचे दोघांनी सांगितले. सिसवा बाजार येथील गोविंद गुप्ता आणि गंगोली ठाणे, कोठीभार, जि. महाराजगंज येथील शंकर यादव अशी त्यांची नावे आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेकदा कारखान्यातून लोखंड चोरून विकला असल्याचे सांगितले. पोलीस पथकातील फौजदार धनंजय राय, हेड कॉन्स्टेबल विक्रम सिंह, कॉन्स्टेबल कुमार निषाद कारवाईत सहभागी झाले होते.