लखीमपूर खीरी (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
अजबापूर साखर कारखान्यातून गाजीपूर जिल्ह्यात नेण्यात येत असलेल्या साखरेच्या चोरीचा छडा लावण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी २०७ साखरेच्या पोत्यांसह संबंधित ट्रक ताब्यात घेतला आहे. तसेच या प्रकरणातील दोन संशयितांना अटकही करण्यात आली आहे. दोघे संशयिती फैजाबाद येथील गोसाईगंजचे रहिवासी आहेत. पोलिस अधिक्षक पूनम यांनी तपास पथकाला २० हजार रुपयांच्या पुरस्काराची घोषणा केली आहे.
घटनेबाबत माहिती अशी, अजबापूर साखर कारखान्यातून एक ट्रक ५०० पोती साखर घेऊन गाजीपूर जिल्ह्यात निघाला होता. ट्रक क्रमांक यूपी-४४ टी-४९०२ मधून गाजीपूर जिल्ह्यातील युसूफपूरमधील दीनबंधू दिनानाथ यांना ही साखर पाठवण्यात येत होती. अनेक दिवस हा ट्रक संबंधित ठिकाणी न पोहोचल्याने त्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले. त्यावेळी ट्रकचा क्रमांकच बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते.
संबंधित क्रमांकाच्या ट्रकचे मालक सुल्तानपूर जिल्ह्यातील जयसिंहपूरचे रहिवासी होते. तर, आरोपींनी ट्रक मालकाचे नाव अनंत श्रीवास्तव, तर ड्रायव्हरचे नाव अशोक सांगितले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर, त्यावरील मोबाईल क्रमांकावरून तपासाला गती मिळाली. त्या मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी फैजाबादमधील गौसाईगंज येथील सुभाष यादव तसेच जवळच्या गावातील श्यामजीत यांना अटक केली. त्यांची चौकशी केली तर, श्यामजीतचा भाऊ राजू संबंधित ट्रक (मूळ क्रमांक यूपी ४४ टी-६५२३) चालवत असल्याची माहिती मिळाली. दगड खाणीतील एका ट्रकचा नकली क्रमांक वापरून हा ट्रक चालविला जात होता.
आरोपींनी दिलेल्या पुराव्यांनंतर, पोलिसांनी माग काढून २०७ पोत्यांसह ट्रक जप्त केला. उर्वरीत २९३ पोती बाजारात विकरण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित आरोपी सराईत असून, यापूर्वी त्यांनी कोंबड्यांचे खाद्य ट्रकमध्ये भरून लांबविले होते.
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp