वेळेत तोड मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून ऊस पेटवण्याचे प्रकार

कोल्हापूर : यंदा उसतोड मजूर कमी असल्याने शेतकऱ्यांचा ऊस वाळून निघाला असतानाही तोड मिळालेली नाही. ऊस पेटवला की तोड लवकर मिळते या मानसिकतेतून शेतकरी ऊस पेटवून देत आहेत. पेटवलेल्या उसाला लगेच तोड येत आहे. ऊस पेटवून तोडण्याचा कारखान्यांकडून अलिखित नियम झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारखान्यांकडे अपुरे तोडणी मजूर असल्यामुळे ऊस पेटवून देण्याची प्रथा सुरू झाली आहे. ऊस पेटवून दिल्यामुळे उसाचे एकरी चार ते पाच टन वजन घटून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यातून एकरी पंचवीस हजारांचे नुकसान होत आहे.

यंदा लांबलेल्या हंगामामुळे बऱ्याच ऊसतोड मजुरांच्या टोळ्या कर्नाटकातील साखर कारखान्यांकडे गेल्या. आता तोडणी मजुरांची कमतरता भासत आहे. ज्या शेतकऱ्यांचे उसाचे क्षेत्र कमी आहे, अशांना मजूरच लागतात. त्यामुळे तोडीस विलंब होत आहे. सद्यस्थितीत ऊस पेटवून दिल्यानंतर गाळपाला घेऊन जाण्याचे प्रकार घडत आहेत. ऊस पेटवल्यानंतर तो लवकर तोडला जातो; मात्र पेटवल्याने वजन कमी होत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here