भारतात अन्न प्रक्रिया सुविधा उभारण्याची यूएईची इच्छा : वाणिज्य मंत्री पीयूष गोयल

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरात (UAE) भारतात अन्न प्रक्रिया सुविधा उभारू इच्छित आहे आणि त्यासाठी ते प्रारंभिक टप्प्यावर अंदाजे २ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करू शकतात, असे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. सोमवारी ‘भारत-यूएई उच्चस्तरीय गुंतवणुकीवरील टास्क फोर्सच्या १२ व्या बैठकी’बद्दल पत्रकारांना माहिती देताना, गोयल म्हणाले की, फूड पार्कमध्ये येत्या दोन ते अडीच वर्षांत २ अब्ज डॉलरची गुंतवणूक होईल.

मंत्री गोयल यांनी पत्रकारांना सांगितले की, संयुक्त अरब अमिरातमध्ये भारतात अन्न प्रक्रिया सुविधा उभारण्यासाठी गुंतवणूक करू इच्छित आहे, जेणेकरुन भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पादनांचा वापर करून यूएईच्या चवीनुसार उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ भारतात तयार करता येतील. यासाठीची चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे. उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि त्यांची यूएई मध्ये विक्री करणे, भारत आणि यूएईमधील व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१३ मध्ये संयुक्त कार्य दलाची स्थापना करण्यात आली होती.

ते म्हणाले, यूएईने फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आणि फूड पार्क लॉजिस्टिक्समध्ये गुंतवणुकीसाठी अंदाजे २ अब्ज डॉलर प्रारंभिक गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. त्याची गरज आखाती देशांमध्ये, विशेषत: यूएईमध्ये साहित्य नेण्यासाठी असेल. केंद्र सरकार, संबंधित राज्य सरकारे आणि यूएई यांदरम्यान मिशन मोडच्या आधारावर दोन्ही देशांदरम्यान फूड कॉरिडॉरची स्थापना पुढे नेण्यासाठी एक लहान कार्यगट स्थापन करण्यावर सहमती झाली आहे.

उच्चस्तरीय बैठकीदरम्यान, गोयल म्हणाले की दोन्ही देशांनी अनेक उदयोन्मुख क्षेत्रांवर चर्चा केली जसे की डेटा केंद्रे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, अक्षय ऊर्जा आणि भारतातील सौर आणि पवन उर्जेसाठी पारेषण पायाभूत सुविधा पुरवल्या जातील. दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक प्रोत्साहन कार्यालये सुरू होतील. यूएईने कार्यालयीन जागा मोफत देण्याची ऑफर दिली आहे. गोयल म्हणाले, आम्ही मान्य केले आहे की यूएई नवीन दिल्लीतील इन्व्हेस्ट इंडिया कार्यालयासह एक समान कार्यालय स्थापन करेल, जे आम्ही त्यांना विनामूल्य प्रदान करू. त्यामुळे या दोन कार्यालयांच्या स्थापनेमुळे मंजुरीसाठी सिंगल विंडो तयार करण्यात मदत होईल. यूएई आणि भारत यांच्यात संधींची एक खिडकी उघडेल.

गोयल यांनी घोषणा केली की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (आयआयएफटी) यूएईमध्ये कॅम्पस स्थापन करेल. आयआयएफटी लवकरच काही कोर्सेस सुरू करेल आणि हळूहळू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडचे संपूर्ण कॅम्पस स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. जगातील आयआयएफटीचे ते पहिले परदेशी कॅम्पस असेल. एप्रिल २००० ते जून २०२४ या कालावधीत सुमारे १९ अब्ज डॉलर्सच्या एकत्रित गुंतवणुकीसह भारताला मिळालेल्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) २ टक्के वाटा असलेला यूएई हा सातवा सर्वात मोठा देश आहे. एप्रिल २००० ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत भारताने यूएईमध्ये एकूण विदेशी थेट गुंतवणुकीपैकी ५ टक्के गुंतवणूक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here