सांगली : बामणी-पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी शुगर कारखान्याच्या २०२४-२५ या बाराव्या गळीत हंगामाच्या काटा व मोळीपूजन करण्यात आले. कारखान्याच्या बाराव्या गळीत हंगामामध्ये साडेसात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अशी माहिती कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांनी दिली. डॉ. कदम, अध्यक्ष राहुल कदम यांच्या हस्ते व सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मोहनराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत काटा व मोळीपूजन झाले. कारखान्याचे इंजिनीअर हणमंत वाघ व त्यांच्या पत्नीच्या हस्ते श्री सत्यनाराण पूजा झाली. कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
उत्तम पाटील यांनी सांगीतले की, कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन पाच हजार टन आहे. डिस्टिलरी १ लाख ५० हजार लिटर क्षमतेची आहे. कारखान्याचा सहवीज निर्मिती चौदा मेगावॉटचा आहे. या हंगामाची सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली असून कारखाना गाळपास सज्ज आहे. ऊस तोडणी व वाहतुकीकरिता मजूर, बैलगाडी, ट्रॅक्टर, मशिनरीची पुरेशी यंत्रणाही तयार आहे. डॉ. कदम म्हणाले की, कारखान्याने आतापर्यंत एफआरपीप्रमाणे एकरकमी ऊस बिल दिले असून ऊस पुरवठादारास अल्पदराने साखरही वितरीत केली आहे. गतवर्षीच्या हंगामापर्यंत शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा करून मदत केली आहे. यावेळी माजी कुलगुरू साबळे, जे. के. जाधव, आबासाहेब चव्हाण, दिलीप पाटील, डी. एम. माने, निवास पाटील आदी उपस्थित होते. प्रल्हाद पाटील यांनी आभार मानले.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.