कंपाला: बँक ऑफ युगांडाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने साखरेची निर्यात घसरल्याने उत्पन्नात ३५ टक्क्यांची घट आली आहे.
स्थानिक साखर उद्योग वाचविण्यासाठी केनिया आणि टांझानियाने युगांडातील साखरेवर विविध निर्बंध लावले आहेत. वितरक बाजारात स्वस्त साखर आयात करतात आणि त्यानंतर साखरेची पुन्हा निर्यात करतात. शेजारील देशांनी साखरेच्या आयातीवर निर्बंध लागल्याने युगांडातील एक लाख ते १,३०००० टन साखर निर्यात झालेली नाही. बँक ऑफ युगांडाकडील आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२० च्या वर्ष समाप्तीवेळीची निर्यात ८ कोटी ३३ लाख ९० हजार डॉलरपर्यंत घसरली. याआधी नोव्हेंबर २०१८ मध्ये ९ कोटी ५३ लाख डॉलर्स निर्यात झाली होती.
केनिया, रवांडा, टांझानिया या देशांनी गेल्या तीन वर्षांमध्ये आपल्या बाजारपेठेत युगांडातील साखरेला अत्यंत कमी प्रवेश दिला आहे. त्यामुळे युगांडाच्या उत्पन्नातही मोठी घसरण झाली आहे. या सप्ताहाच्या सुरुवातीला केनियाने युगांडातून ९० हजार मेट्रिक टन साखरेच्या आयातीला परवानगी देण्यात येईल असे सांगितले होते. मात्र, आता त्यास नकार दिला आहे. युगांडा शुगर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष जीम काबेहो यांनी सांगितले की केनियाने ९० हजाट मेट्रिक टन साखरेच्या आयातीला परवानगी दिलेली नाही. २०१९ मध्ये केनियाने युगांडातील साखर निर्यातदारांना परवाना देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आतापर्यंत परवानगी मिळालेली नाही.