नवी दिल्ली : भारतीय हवामान विज्ञान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह काही राज्यांना या आठवड्यात असह्य उकाडा आणि उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळू शकतो. आयएमडीने आपल्या ताज्या हवामान अपडेटमध्ये म्हटले आहे की, पुढील तीन दिवसांत काही राज्यांतील तापमान २-४ डिग्री घसरण्याची शक्यता आहे. २ मेपर्यंत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहील. मात्र, नंतर याची तिव्रता कमी होणार आहे. अनेक राज्यांना उष्णतेपासून दिलासा मिळेल. याशिवाय पावसाची शक्यता आहे.
याबाबत मनीकंट्रोल डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, दिल्ली, हरियाणा, चंदीगढ, पंजाबसारख्या राज्यांना आणि केंद्रशासीत प्रदेशांमध्ये ३-४ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात २ ते ४ मे यादरम्यान हलका पाऊस होईल. राजस्थानमध्ये २ आणि ३ मे रोजी वादळी वाऱ्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सोमवारी आणि बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाचे पूर्वानुमान व्यक्त केले आहे. त्यातून दिल्लीवासियांना दिलासा मिळेल. दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश, कच्छ आणि पूर्व राजस्थानमध्ये उष्णतेची लाट कमी होईल असे आयएमडीने म्हटले आहे. हवामान विभागाने मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, राजस्थानमध्ये ३ मेपासून उष्णतेची लाट संपेल असे सांगितले. २ ते ४ मे यांदरम्यान हरियाणा, चंदीगढ, दिल्लीत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल असे म्हटले आहे.