भारत आणि लॅटिन अमेरिकन व कॅरिबियन (एलएसी) प्रदेश यांच्यात सहयोग आणि विश्वास निर्माण करण्याच्या गरजेवर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भर दिला आहे. त्यांनी काल नवी दिल्ली येथे आयोजित ‘9व्या सीआयआय इंडिया-एलएसी परिषदेत’ विशेष मंत्रिस्तरीय सत्राला संबोधित केले. भारत आणि एलएसी प्रदेश यांच्यात सांस्कृतिक संबंध असून हे भूतकाळातील वसाहतवादाच्या छायेतून बाहेर आले आहेत, असे गोयल म्हणाले.
व्यापार आणि गुंतवणुकीत वाढ, सहयोगाद्वारे व्यवसायांचे एकत्रीकरण आणि मुक्त व्यापार कराराद्वारे (एफटीए) भारताला जलद आर्थिक विकास साधायचा आहे असे गोयल यांनी सांगितले. भारत आणि एलएसी प्रदेश यांच्यातील दृढ सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशाने (i) व्यापार प्रवाह वाढवणे, (ii) द्विपक्षीय भागीदारीचा लाभ घेणे, (iii) आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण सहकार्य आणि (iv) जागतिक समस्यांवर काम करणे हा सर्वसमावेशक चार-कलमी अजेंडा त्यांनी सादर केला.
व्यापाराला चालना देण्यासाठी, प्रत्येक देशाच्या तुलनात्मक आणि स्पर्धात्मक सामर्थ्यांचा लाभ घेता येईल अशी सुव्यवस्थित रुपरेषा तयार करण्याची गरज गोयल यांनी व्यक्त केली.
द्विपक्षीय भागीदारीचा लाभ घेण्यासाठी, अधिकाधिक गुंतवणुकीला चालना देण्याकरिता द्विपक्षीय सहकार्याच्या क्षमतेवर त्यांनी प्रकाश टाकला. विशेषत: पर्यटन, आदरातिथ्य आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये पुरवठा साखळीच्या एकीकरणाच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. भारत आणि एलएसी प्रदेश, संसाधने एकत्र करून जागतिक परिणामांसह किफायतशीर उपाययोजना विकसित करू शकतात असे गोयल म्हणाले.
आरोग्य सेवा आणि औषधनिर्माण क्षेत्रातील सहकार्यासाठी, उत्तम नियामक पद्धतींचा अवलंब करण्यासोबतच औषधनिर्माण क्षेत्रातली परस्पर मान्यता करारांचे महत्त्व गोयल यांनी अधोरेखित केले.
जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी, भारत आणि एलएसी प्रदेश यांच्यातील सामूहिक प्रयत्नांमुळे अतिशय जटील जागतिक समस्यांवरही नवोन्मेषी उपाय मिळू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भागीदारी, पुरवठा साखळीचे एकीकरण, आपली खनिज संसाधने, तंत्रज्ञान, कौशल्ये, श्रमशक्ती इत्यादींचा एकत्रितपणे उपयोग करून आपल्या सर्वांना एकत्र काम करण्याचे आवाहन समकालीन जागतिक आव्हाने करतात. यामुळे गरिबी, हवामान बदल, विषमता इत्यादी आव्हानांना सामोरे जाण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2047 पर्यंत 35 ट्रिलियन अमेरीकी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करण्याच्या भारताच्या आकांक्षेवर पीयूष गोयल यांनी प्रकाश टाकला. या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टामुळे भारत-एलएसी भागीदारीसाठी अनेक मार्ग खुले होतील. सकारात्मक जागतिक प्रभावासाठी ते उत्प्रेरक म्हणून काम करू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विश्वासू भागीदार म्हणून एकत्र काम करण्यासाठी आणि सामायिक हितसंबंधांचा विस्तार करण्यासाठी एलएसी राष्ट्रांनी भारताच्या विकास प्रवासात सामील होण्याचे आमंत्रण गोयल यांनी दिले.
(Source: PIB)