मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर दाखल होत आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्या प्रमुख गुंतवणूकदारांनी संवाद साधणार आहेत.
सीतारमण यांच्या कार्यालयाने याबाबत ट्वीट केले आहे. बांद्रा कुर्ला परिसरातील आयकर भवनात त्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर सेवा कर तथा सिमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत अप्रत्यक्ष कराबाबत बैठक घेतली जाईल. भारतीय उद्योग महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उद्योगपतींच्या बैठकीसही त्या उपस्थित राहतील. कोरोना महामारीनंतरचा हा त्यांचा पहिला दौरा आहे. केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेच्या सुधारणेची गती तिव्र केली असताना त्यांचा हा दौरा होत आहे. दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री सीतारमण या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या प्रमुखांची बैठक घेतील. त्यानंतर भारतीय बॅंक संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार आहेत. काही निवडक पत्रकारांशी त्या संवाद साधणार आहेत. एनएमपी कार्यक्रमाची घोषणा यापूर्वी सीतारमण यांनी केली आहे. या अंतर्गत केंद्र सरकार सहा लाख कोटी रुपये जमा करणार आहे.