नवी दिल्ली : चालू रब्बी हंगामात सरकारी संस्थांची गहू खरेदी 26 दशलक्ष टन पार झाली आहे. या आठवड्यात भारतीय अन्न महामंडळ आणि राज्य खरेदी एजन्सींच्या गहू खरेदीचा आकडा 27 दशलक्ष टनांपेक्षा जास्त ओलांडण्याची शक्यता आहे.सरकारी सूत्रांनी ‘एएनआय’ला सांगितले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसाठी 27 दशलक्ष टन पुरेसा असेल आणि आवश्यक बफर स्टॉक या महिन्याच्या शेवटपर्यंत होईल. अन्न मंत्रालयाचा या हंगामात 30-31 दशलक्ष टन गहू खरेदीचा अंदाज होता.
यंदा पंजाबमधून गव्हाची 12.36 दशलक्ष टन विक्रमी खरेदी करण्यात आली आहे आणि ही खरेदी हंगामाच्या अखेरपर्यंत 12.50 दशलक्ष टनापर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. एफसीआय आणि राज्य सरकारी संस्थांनी पंजाबपाठोपाठ हरियाणामधून सुमारे 7.1 दशलक्ष टन गव्हाची खरेदी केली आहे. मध्य प्रदेश खरेदीमध्ये मागे आहे, आतापर्यंत येथून फक्त 4.73 दशलक्ष टन गव्हाची खरेदी झाली आहे. आतापर्यंत गहू खरेदीमध्ये उत्तर प्रदेशचा वाटा फक्त 0.88 दशलक्ष टन इतका आहे. सरकारने आर्थिक वर्ष 25 साठी गव्हासाठी 2275 रुपये प्रति क्विंटलचा MSP जाहीर केला आहे, जो मागील हंगामापेक्षा 150 रुपये जास्त आहे. एमएसपी व्यतिरिक्त, राजस्थान आणि मध्य प्रदेशने राज्यात खरेदीला चालना देण्यासाठी प्रति क्विंटल 125 रुपये बोनस जाहीर केला आहे.