अंबाला : फक्त गहू, तांदूळ, ऊस आणि मक्का उत्पादन करून शेतकऱ्यांची गरीबी संपणार नाही तर त्यांना “अन्नदाता” होण्याबरोबरच “ऊर्जादाता” बनावे लागेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कर्नालमधील कुटेल गावात १,६९० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ३५ किमी लांब कर्नाल ग्रीन फिल्ड सहापदरी रिंग रोड योजनेच्या कोनशिला समारंभानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.
मंत्री गडकरी म्हणाले, तुकडा तांदूळ, भाताचे तूस, मक्का, बांबू, उसाचा रस आणि गुळ यांच्यापासून इथेनॉल उत्पादन केले जात आहे. आता शेतकऱ्यांनी ऊर्जा उत्पादन करणाऱ्या पिकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जैव तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि ऊर्जा प्रदाता बनले पाहिजे. जर १६ लाख कोटी रुपयांपैकी १० लाख कोटी रुपये शेतकऱ्यांकडे जात असतील तर ते समृद्ध आणि शक्तीशाली बनतील. देश बदलत आहे आणि आम्ही जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहेत.
गडकरी म्हणाले की, एन एच ४४ वर शामगढ गावापासून बरोटा रोडपर्यंतच्या रिंग रोडमुळे कर्नाल शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल. वाहनांचा खर्चही कमी होईल. हरियाणात शेतीसाठी आदर्श जमीन आहे. प्रती एकर उत्पादन चांगले आहे. आपण १६ लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करतो. शेतकऱ्यांनी ऊर्जा देणारी पिके उत्पादित केली तर त्याचे प्रमाण घटेल.