नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे २९ ऑगस्ट रोजी टोयाटोची इनोव्हा कारचे नवे मॉडेल लाँच करतील. ही कार १०० टक्के इथेनॉल इंधनावर चालणार आहे. ‘मींट सस्टेनेबल समीट’मध्ये बोलताना मंत्री गडकरी यांनी ही माहिती दिली. मंत्री गडकरी यांनी गेल्यावर्षी हायड्रोजनवर चालणारी टोयाटो मिराई ईव्ही कार लाँच केली होती.
गडकरी म्हणाले की, २९ ऑगस्ट रोजी मी १०० टक्के इथेनॉलवर धावणारी लोकप्रिय कार लाँच करणार आहे. ही कार जगातील पहिली बीएस ६ (स्टेज दोन) फ्लेक्स फ्युएल कार असेल. गडकरी म्हणाले की, २००४ मध्ये पेट्रोलच्या किमती वाढू लागल्यानंतर देशाने जैवइंधन क्षेत्राकडे आपले लक्ष वळवले आहे.
ते म्हणाले, जैव इंधन चमत्कार करू शकतो. पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवर होणाऱ्या खर्चातून मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची बचत होऊ शकते. सध्या हा खर्च १६ लाख कोटींवर आहे. तो शुन्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्ही सातत्याने विविध योजना राबवत आहोत. मात्र, आम्हाला आणखी काही उपायांची गरज आहे. पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असेही मंत्री गडकरी यांनी स्पष्ट केले.