केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चौहान म्हणाले की पंतप्रधानांनी काल घेतलेला पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा होता हे सांगायला आपल्याला अतिशय आनंद वाटत आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शक्य असलेले प्रत्येक पाऊल उचलेल, असे ते म्हणाले. गेली 10 वर्षे रालोआ सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे आणि आपले मंत्रालय ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काम करेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्र्यांनी त्यांच्या मंत्रालयातील विविध कार्यालयांना भेट दिली आणि सफाई कर्मचाऱ्यांसह तिथे विविध स्तरांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. शेतकरी कल्याणाचे सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक संघ म्हणून काम करण्याचे आणि परस्परांच्या सहकार्याने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी मंत्रालयातील कृषी एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्राला देखील भेट दिली आणि देशातील पीक उत्पादन आणि दुष्काळ सज्जतेसह कृषी परिदृश्याचा आढावा घेण्यासाठी विविध सुविधांची पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली आणि मंत्रालयाच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकतेची गरज अधोरेखित केली. त्यांनी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासासाठी सरकारचा जाहीरनामा सुपूर्द केला आणि त्याची पूर्तता करण्यासाठी काम करण्याचे सर्वांना आवाहन केले. अन्नदात्याच्या जीवनमानात सुधारणा करणे हे मंत्रालयाचे मिशन असले पाहिजे, असे ते म्हणाले. रामनाथ ठाकूर आणि भगीरथ चौधरी यांनी देखील कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला.
(Source: PIB)