सरकारच्यावतीने पुढील पाच वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांना हळूहळू बंद करण्याची योजना तयार करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूरमध्ये शनिवारी रोडमार्क फाउंडेशनद्वारे आयोजित रस्ता सुरक्षा विषयक चर्चासत्रात ते बोलत होते.
यासोबतच त्यांनी वीज, इथेनॉल, हायड्रोजन आणि फ्लेक्स इंजिनच्या वाहनांचे जास्तीत जास्त उत्पादन करणे आणि त्या वाहनांचा वापर करण्याच्या मुद्यावर भर दिला. ते म्हणाले, या बदलांमुळे देशाला जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील १६ लाख कोटी रुपयाची बचत होईल.
इथेनॉलच्या वापरावर भर देण्याचे आवाहन करताना गडकरी म्हणाले की, लवकरच अशा इंधनावर चालणारी इनोव्हा लाँच करण्याची योजना आहे. जर लोक इथेनॉलवर चालणारी वाहने खरेदी करतील, तर त्यापासून थेट शेतकऱ्यांना बळ मिळेल. ते याचे उत्पादन करीत आहेत. लोक या इंधनाला फक्त १५ रुपये प्रती लिटर या दराने मिळवू शकतील. यातून प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत होईल.
यासोबतच गडकरी यांनी असेही सांगितले की, नागरिकांनी केवळ स्टार रेटेड वाहनांना प्राधान्य देण्याची गरज आहे. आम्ही शहरांमध्ये CNG आणइ LNG पंप सुरू केले आहेत. बजाज आणि टीव्हीएसने या इंधनावर चालणारी तीनचाकी वाहने लाँच केली आहेत. आपण नागपूरला दुर्घटना आणि प्रदूषणमुक्त करण्याची गरज आहे.