छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी पडलेल्या मेघगर्जनेसह अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी शेतात पाणी साचून तळ्यांचे स्वरूप आले. या वादळी पावसाच्या तडाख्यात मका, ज्वारीचे पीक भुईसपाट झाले. वेचणीसाठी आलेल्या कपाशीच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. शेतात सोंगून ठेवलेला मका पाण्यावर तरंगत असल्याचे ठिकठिकाणी दिसून येत होते. फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या तुरीच्या पिकाचे आणि कांद्याचेही नुकसान झाले आहे. राज्य सरकार ने जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे.
अवकाळी पावसाचा फटका कपाशी, तूर, मका पिकाला बसला असला तरी हरभरा, गहू, कांदा या पिकांना पाऊस फायदेशीर ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गंगापूर तालुक्यात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. रविवारी रात्रभर प्रचंड पाऊस पडला. अति पावसामुळे शेतातील कापसाची बोंडं खाली गळून पडली आहेत. वेचणीला आलेला कापसाची दाणादाण उडाली आहे. रबी हंगामातील ज्वारी, गहू या पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. तालुक्यात हुरडा ज्वारी चे उत्पादन घेतले जाते. त्याचेही नुकसान झाले आहे. या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.