कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने ऊस गळीत हंगामाला ब्रेक लागला आहे. ऊस तोडणीत अडखळे आल्याने साखर कारखान्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आधीच ऊस दरासाठी झालेल्या आंदोलनामुळे हंगामाला उशीर झाला आहे. त्यातही आताच्या पावसाने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.
राज्यात ३० नोव्हेंबरअखेर १७२ कारखाने सुरू झाले आहेत. त्यांनी १६१ लाख टन उसाचे गाळप केले. गेल्या वर्षी याच कालावधीत १८८ साखर कारखान्यांनी २२६ लाख टन उसाचे गाळप केले होते. पुणे व सोलापूर जिल्हे हे सध्या गाळपात आघाडीवर आहेत. विभागात ३७ लाख टनापर्यंत तोडणी झाली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात २२ लाख टन तोडणी झाली.
दरम्यान, दक्षिण महाराष्ट्रात पावसाने केवळ ४० टक्के ऊस तोडणी सुरू आहे. ऊस तोडणीचे शेड्यूल पूर्णपणे बिघडले आहे. अवकाळी पावसामुळे शेतांमध्ये वाहने अडकली आहेत. ती बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मजुरांद्वारे आणि मशीनद्वारेही सुरू असलेली ऊस तोडणी बंद पडली आहे. ऊस तोडणी, मजुरांच्या राहण्याच्या ठिकाणीही पाणी साचले आहे.