कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गेल्या ७० दिवसांत १ लाख ७६ हजार १४० मे. टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ११.६३ टक्के साखर उतारा असून कारखान्याने २ लाख ५ हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. या साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., अमृतनगर गवसे अशा नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले.
अध्यक्ष धुरे यांनी सांगितले की, संचालक मंडळाने गळीत हंगामात किमान ३ लाख ५० हजार मे. टन गाळप करण्याचे नियोजन केले आहे. ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वेळच्या वेळी पाठविण्यात येत आहे. तोडणी वाहतूक यंत्रणेची बिलेही देणेत येत आहेत. यावेळी उपाध्यक्ष मधुकर देसाई यांच्यासह सर्व संचालक, तसेच प्रभारी कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती, जनरल मॅनेजर (टेक्नी.) व्ही. एच. गुजर, प्रोडक्शन मॅनेजर एस. के. सावंत आदी उपस्थित होते.