शामली : जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांच्या उपस्थितीत जसाला गावात खतौली साखर कारखान्याच्यावतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी शेतकरी देवेंद्र सिंह यांच्या शेतामध्ये ऊस पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन करून अधिकाधिक उत्पादन कसे मिळवता येईल, याबाबत माहिती देण्यात आली.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकारच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या ऊस विकास योजनेबाबत शेतकऱ्यांना कृषीतज्ज्ञांनी माहिती दिली. ऊस पिकावरील टॉप बोरर किड कशी ओळखावी आणि त्याला आळा घालण्यासाठी कोराजन व फर्टेराचा वापर कसा परिणामकारक करता येईल, याबाबत खतौली साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. अशोक कुमार यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना जादा उत्पादन मिळविण्यासाठीच्या टिप्स आणि पायरिला किडीच्या नियंत्रणाची माहिती ऊस विभागाचे महाव्यवस्थापक कुलदीप राठी यांनी दिली.
पावसाळ्याच्या काळात अधिक वेगाने पसरणाऱ्या पोक्का बोईंग रोगावर कशी उपाययोजना करावी याबाबत किटनाशक कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विनय चौहान यांनी माहिती दिली. यावेळी प्रितम सिंह, बाबू, विजेंद्र कुमार, रमेश कुमार, रहतूलाल शर्मा, विनोद प्रधान, राधेश्याम गिरी, अनुज, सोम गिरी, जिले सिंह, मांगेराम आदींसह शेतकरी उपस्थित होते.