मेरठ : पुठखास येथील सत्यधाम आश्रमात शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांनी उसाची बिले थकीत ठेवणाऱ्या साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलनाची घोषणा करताना कारखान्याला आगामी गळीत हंगामात कोणत्याही परिस्थितीत ऊस पुरवठा न करण्याचा निर्धार केला. किनौनी आणि सिंभावली साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामातील पैसे शेतकऱ्यांना अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विजेंद्र प्रमुख यांनी सांगितले की, किनौनी साखर कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्रांऐवजी जे वेळेवर पैसे देतील अशा कारखान्याच्या केंद्रांची मागणी केली जाईल. याबाबत ३१ जुलै रोजी एक शिष्टमंडळ जिल्हा ऊस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. जर त्यांनी या मागण्या मान्य केल्या नाही, तर त्यानंतर आंदोलनाची रुपरेषा ठरवली जाईल. कारखान्यांना ऊस पुरवठा केला जावू नये यासाठी प्रयत्न करू.
यावेळी मनोज शर्मा, मांगेराम शर्मा यांची भाषणे झाली. पप्पू प्रधान अरनावली, नजाकत अली, प्रधान सलाहपूर, राधेश्याम शर्मा, मिंटू शर्मा, अनिल पेपला, अरुण प्रधान शेखपुरी, कंवरपाल ठाकूर, सलीम खान, संजय बावरा, बिद्र, रामकुमार, नरेंद्र, राजवीर आदी उपस्थित होते.