यूपी : हरियाणा-पंजाबच्या धर्तीवर ऊस दर जाहीर करण्याची मागणी

शामली : पंजाबमध्ये प्रती क्विंटल ३८० रुपये ऊस दर जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडूनही हरियाणा, पंजाबप्रमाणे ऊस दरवाढीची अपेक्षा आहे. गेल्यावर्षी उत्तर प्रदेशमध्ये ऊस दर प्रती क्विंटल ३५० रुपये होता. तर हरियाणात ३६२ रुपये आणि पंजाबमध्ये ३६० रुपये देण्यात येत होते. यावर्षी नव्या ऊस हंगामात पंजाब सरकारने ऊस दरात २० रुपयांची वाढ करून ३८० रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. त्यामुळे ते उत्तर भारतात सर्वाधिक ऊस दर देणारे राज्य बनले आहे.

अमर उजालामधील वृत्तानुसार, यापूर्वी हरियाणात १२ रुपये तर पंजाबमध्ये दहा रुपये जादा ऊस दर होता. गेल्यावर्षी युपी सरकारने ऊस दर दहा रुपयांनी वाढवले. यावर्षी हरियाणात आणि उत्तर प्रदेशमध्ये कोणतीही दरवाढ केलेली नाही. सद्यस्थितीत गळीत हंगाम सुरू होऊन १२ दिवस उलटले आहेत. पंजाब सरकारने ऊस दर ३८० रुपये जाहीर केला आहे. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने दराची घोषणा केलेली नाही. जिल्ह्यातील शेतकरी हरियाणा, पंजाबच्या धर्तीवर ऊस दर देण्याची मागणी करीत आहेत असे शेतकरी युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष सवित मलिक यांनी सांगितले. गेल्या सहा वर्षात राज्यात प्रती किलो ३५ पैसे दरवाढ झाली. या काळात खते, किटकनाशके, वीज, डिझेल, कृषी यंत्रांची मोठी दरवाढ झाली. गेल्या दोन वर्षात शेतीच्या खर्चात २० टक्के वाढ झाली. मात्र, सरकारकडून काहीच उपाययोजना केली गेलेली नाही, असे त्यांनी सांगितले. सत्तारुढ भाजप सरकारकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप भाकियूचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here