युपी : थकीत बिलांप्रश्नी आंदोलनाची शेतकऱ्यांची घोषणा, पुढील हंगामात ऊस न देण्याचा निर्धार

मेरठ : मेरठ येथे शेतकऱ्यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. त्यांना निवेदनही सादर केले. पैसे थकवणाऱ्या कारखान्यांविरोधात आपला रोष व्यक्त करतानाच अशा कारखान्यांना पुढील हंगामात शेतकरी कोणत्याही परिस्थितीत ऊस पुरवठा करणार नाहीत, असा निर्धार करण्यात आला.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, किनौनी आणि सिंभावली साखर कारखान्याने शेतकऱ्यांना गेल्या हंगामात खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. मुलांची शैक्षणिक फी भरण्यासह दैनंदिन कामासाठी त्यांच्याकडे पैसे उरलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे थकवणाऱ्या कारखान्यांना कोणत्याही परिस्थितीत आगामी हंगामात ऊस पुरवठा न करण्याचा निर्धार केला. विभागातील इतर कारखाने ऊस बिले देत असताना किनौनी कारखान्याकडून पैसे मिळत नसल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना सुविधा मिळत नसल्याचे शेतकरी ऊस संघर्ष समितीचे अध्यक्ष विजेंद्र प्रमुख यांनी सांगितले. किनौनी साखर कारखान्याच्या केंद्राऐवजी वेळेवर पैसे देणारे केंद्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आंदोलनाची रुपरेषा लवकरच तयार करण्याचे ठरले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनोज शर्मा होते. मांगे राम शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. पप्पू प्रधान, नजाकत अली, राधेश्याम शर्मा, मिंटू शर्मा, अनिल पेपला, अरुण प्रधान, कंवरपाल ठाकुर, सलीम खान, संजय बावरा, बिट्टू, रामकुमा नरेंद्र, राजवीर, अशोक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here