मुरादाबाद : सध्या उसावर पोक्का बोईंग रोगाचा फैलाव दिसून येत आहे. त्यामुळे या विभागातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. आपले ऊस पिक वाचविण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. छजलैटचे राजकीय कृषी सुरक्षा युनिटचे प्रभारी अनिल कुमार यांनी सांगितले की, सध्या या रोगाची सुरुवात सुरू आहे. यामध्ये आधी उसाच्या पानांवर परिणाम होतो. ती आकूंचन पावतात आणि त्यावर डागही दिसून येतात. रोगग्रस्त पाने गळून काळी पडतात. त्यातून उसाची वाढ खुंटते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पोक्का बोईंग रोगाची दुसरी अवस्था घातक असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये ऊसावरील सर्व पाने गळून पडतात आणि उसाचा शेंडा खराब होतो. याची तिसरी अवस्था नाइफ कट असते. त्यामध्ये शेंड्याकडील भागावर घाव दिसून येतात. शेतकऱ्यांनी सुरुवातीची लक्षणे दिसून आल्यावर उसाची कायम पाहणी करावी.
प्राथमिक अवस्थेत दिसून आलेल्या पोक्का बोईंग रोगावर कॉपर ऑक्सीक्लोराइड ५०%, डब्ल्यूपी ०.२ टक्के (अर्थात एक लिटर पाण्यात २ ग्रॅम औषध) अथवा कार्बेंडेझीम ५०%, डब्ल्यूपी ०.१ टक्के पंधरा दिवसांच्या अंतराने फवारावे. या नियमीत फवारणीने पिकाचे नुकसान रोखले जाईल असे अनिल कुमार यांनी सांगितले.