उत्तर प्रदेश सरकारकडून सहा वर्षांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी २.१४ लाख कोटी रुपये अदा

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने गेल्या सहा वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी २.१४ लाख कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. राज्य सरकारने दोन नवे साखर कारखाने सुरू केले असून चार बंद कारखानेही पुनरुज्जीवीत केले आहेत. तर ३० कारखान्यांचा विस्तार केला आहे.

द स्टेट्समनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उत्तर प्रदेशचा कारभार हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे.

उत्तर प्रदेशात १२० साखर कारखाने सुरू आहेत. २०२१-२२ मध्ये कारखान्यांनी १,०१६.२६ लाख टन ऊस गाळप करून १०१.९८ लाख टन साखर उत्पादन केले. २०२२-२३ मध्ये १.०९८.३१ लाख टन ऊस गाळप करुन १०५.४१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या सहा वर्षात ६४०३ लाख टन ऊस गाळप करून उच्चांकी ६८३.०७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. या कालावधीत साखर कारखान्यांची गाळप क्षमता ७८,९०० टीसीडीने वाढवण्यात आली आहे.

सरकारच्या खांडसरी धोरणात सुधारणा करून युपीमध्ये ऑनलाइन खांडसरी लायसन्स व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत युपीत २८४ खांडसरी युनिट असून ३१,६९० लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. सरकारच्या प्रयत्नांनी २०१६-१७ मध्ये ४२.०७ कोटी लिटर असलेले इथेनॉल उत्पादन आता १६० कोटी लिटर झाले आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना ऊस क्षेत्राशी जोडले आहे. राज्यात ३१९६ महिला स्वयंसाह्य समुह सक्रीय असून यात ६०,००० ग्रामीण महिला ऊसाची रोपे तयार करून उपजिविका करत आहेत. महिलांनी ३८ लाख रोपे तयार केले असून त्याद्वारे १०२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here