लखनौ : रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितले की, त्यांच्या उद्योग समुहाने पुढील चार वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात अतिरिक्त ७५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. ही गुंतवणूक दूरसंचार, किरकोळ आणि नूतनीकरणक्षम व्यवसायांमध्ये असेल, ज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक लाखाहून अधिक अतिरिक्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. अंबानी यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात रिलायन्स समुहाने उत्तर प्रदेशात जवळपास ५०,००० कोटी रुपयांच गुंतवणूक केली आहे.
अंबानी यांनी लखनौत सुरू असलेल्या तीन दिवसीय यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०२३ च्या उद्घाटन समारंभात बोलताना ही माहिती दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे होते. हे उत्तर प्रदेशातील सर्वात मोठी गुंतवणूक परिषद होती. या मेगा इव्हेंटचा उद्देश जगभरातील धोरण निर्माते, उद्योगपती, थिंक टँक आणि नेत्यांना सामूहिक रुपात व्यापार संधींची माहिती मिळावी आणि भागीदारी करता येण्यासाठी एकत्र आणणे असा आहे.
मुकेश अंबानी म्हणाले की, Jio डिसेंबर २०२३ पर्यंत उत्तर प्रदेशातील प्रत्येक शहर, गावापर्यंत पोहोचण्यासाठी ५Gचे आपले रोलआऊट पूर्ण करेल. ते म्हणाले की, भारतातील विभागीय असंतुलन गतीने गायब होत आहे. तसेच शहरी आणि ग्रामीण भारतामधील दरीही कमी होत आहे. उत्तर प्रदेश हे याचे उदाहरण आहे. अंबानी म्हणाले की, मला विश्वास वाटतो की, भारत खूप मजबुत विकास मार्गावर चालत आहे. अलिकडेच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, यंदाच्या बजेटने विकसित राष्ट्राच्या रुपात भारताला विकसित होण्याचा पाया रचला आहे.