चीनी मंडी ,लखनौ (24 Aug) :
भारतातील साखरेच्या बाजारपेठेच्या आव्हानाला समोरे जाताना उत्तर प्रदेश सरकारने गूळ निर्मितीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात उसाचे आणि साखरेचे बंपर उत्पादन झाल्यामुळे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. त्यानंतर यंदाच्या हंगामातही विक्रमी ऊस उत्पादन झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या हातात पैसे मिळावेत, यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गूळ निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
गुळाला किंवा रिफाइंड न केलेल्या साखरेला उत्तरप्रदेशात खांडसारी असेही म्हटले जाते. घट्ट उसाच्या रसापासून खांडसारी तयार केली जाते. रिफाइंड नसली, तरी केमिकल मिश्रीत साखरेपेक्षा याला मागणी अधिक असते.
एकेकाळी एकट्या उत्तरप्रदेशात जवळपास ५ हजार छोटे मोठे खांडसारी उद्योग होते. गेल्या हंगामात जवळपास १ हजार खांडसारी उद्योग उत्तर प्रदेशमध्ये होते. त्यातील केवळ १६१ जणांकडेच परवाना आहे.
या ग्रामीण उद्योगापासून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी तसेच ऊस उत्पादकांपुढे एक पर्याय असावा म्हणून, उत्तर प्रदेश सरकारने काही पावले उचलली होती. त्यात पूर्वी साखर कारखान्यांपासून १५ किलोमीटर बाहेर खांडसारी उद्योग सुरू करण्याची असलेली अट आठ किलोमीटर करण्यात आली.
सरकारकडे असलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार १६१ खांडसारींमध्ये गेल्या हंगामात ४.३२ दशलक्ष टन उसाचे क्रशिंग झाले. राज्यात ११९ साखर कारखान्यांमध्ये १११ दशलक्ष टन उसाचे क्रशिंग होते. खांडसारींमधील रिकव्हरीच्या तुलनेत कारखान्यांमद्ये दुपटीहून अधिक रिकव्हरी होते.
सध्या सरकारने नवीन खांडसारींसाठी १६ परवाने दिले आहेत. तर आणखी आठ परवाने देण्याचे काम सुरू आहे. नव्या खांडसारी मोरादाबाद, मेरठ, बरेली, शामली, सितापूर, रामपूर, रखिमपूर खेरी गाझियाबाद या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.
सोळा खांडसारी प्रकल्पांमधून रोज ५ हजार ३०० टन उसाचे क्रशिंग होणे अपेक्षित आहे. हा एका पू्र्ण क्षमतेने चालणाऱ्या एका साखर कारखान्या इतका आहे. उत्तर भारतात प्रमुख्याने घरगुती खाद्यपदार्थांमध्ये आणि मिठाईमद्ये खांडसारीचा उपयोग केला जातो. मळीची मात्रही जास्त असल्याने देशी दारूच्या निर्मितीसाठीही त्याचा वापर केला जातो.
आगामी हंगामापूर्वी ५० नव्या खांडसारींना परवाना दिला जाईल, अशी अपेक्षा उत्तर प्रदेश सरकारचे ऊस आयुक्त संजय बोसरेड्डी यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात रोज २० हजार टन उसाचे क्रशिंग वाढेल, जणू चार नवे साखर कारखानेच राज्यात सुरू झाल्यासारखे होणार आहे.
ग्रामीण भागातील उद्योजक आणि शेतकऱ्यांना यांना कमीत कमी वेळेत खांडसारी प्रकल्पाचे परवाने दिले जाणार असल्याचेही बोसरेड्डी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हातात नगदी पैसा हे या उद्योगाचे वैशिष्ट्य आहे. सध्या उत्तर प्रदेशात साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची देणी थकीत आहेत. त्यामुळे खांडसारीचा पर्याय शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. खांडसारीच्या निमित्ताने उसाची तोड लवकर होईल आणि शेतकऱ्यांच्या जमिनी गव्हाच्या पेरणीसाठी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, उसाचे बंपर उत्पादन झाल्यासच खांडसारीला परवानगी द्यावी, इतर काळात ते बंद करण्यात यावेत, असे मत साखर उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहे.