लखनौ : चीनी मंडी
उत्तर प्रदेश सरकारने साखर कारखान्यांना बी-ग्रेड मोल्यासिसपासून थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने नुकताच इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या धोरणानुसार तेल कंपन्यांना ४७.४९ रुपये प्रति लिटर प्रमाणे इथेनॉलचा पुरवठा करण्यात येणार आहे.
मुळात उसापासून तीन प्रकारे इथेनॉलची निर्मिती करता येते. त्यात थेट उसाच्या रसापासून, बी-ग्रेड मोल्यासिसपासून तसेच सी-ग्रेड मोल्यासिसपासून इथेनॉलची निर्मिती होते.
दरम्यान काही देशांमध्ये थेट उसाच्या रसापासूनच थेट इथेनॉल निर्मिती होते. भारतात मात्र, सामन्यपणे सी ग्रेड मोल्यासिसपासून इथेनॉल निर्मिती होते. भारतात एखाद्या पिकाचा वापर थेट इंधन निर्मितीसाठी केला, तर साखरेचा तुटवडा होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. गेल्या काही दशकांत हा खूपच संवेदनशील विषय बनला आहे.
दरम्यान, २०१७-१८ मध्ये ३२ दशलक्ष टन उसाचे उत्पादन झाले आहे. भारतातील वार्षिक मागणी २५ दशलक्ष टन आहे. त्यापेक्षा अधिक ऊस उत्पादन झाल्यामुळे साखरेचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. आगामी हंगामातही उसाचे उत्पादन आणि वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचेही विक्रमी उत्पादन होऊन, दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत साखरेच्या दराचा गोडवा कमीच राहणार आहे.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश या सर्वाधिक ऊस उत्पादन करणाऱ्या राज्यात ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला वाचवण्याची वेळ आली आहे. बी ग्रेड मोल्यासिसपासून इथेनॉल निर्मिती केल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी होईल. त्यामुळे साखरेचे दर स्थीर राहतील आणि शेतकऱ्यांची देणी भागवता येणेही शक्य होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.