युपी : थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी ‘भाकियू’चे साखर कारखान्यासमोर आंदोलन

हापुड : थकीत ऊस बीलप्रश्नी भाकियूच्या नेतृ्त्वाखाली बेमुदत आंदोलन सुरू केलेल्या शेतकऱ्यांनी ऊस नियंत्रकांचा पुतळा जाळण्याचा इशारा दिला आहे. बँकांनी कर्ज न भरल्याने न्यायालयाने सिंभावली साखर कारखान्याला जून महिन्यात दिवाळखोर घोषित केले होते. व्यवस्थापन यंत्रणेकडून सर्व जबाबदाऱ्या परत घेण्याच्या आणि मिलचे कामकाज सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने न्यायालयाने अनुराग गोयल यांची आयआरपी म्हणजेच नियंत्रक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, नियंत्रकाच्या कारभाराच्या निषेधार्थ ‘भाकियू’ने कारखान्याच्या मुख्य कार्यालयासमोर शनिवारी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

भाकियूचे जिल्हाध्यक्ष दिनेश खेडा आणि जिल्हा प्रवक्ते खुशनुद ज्युनियर म्हणाले की, सिंभावली आणि ब्रजनाथपूर साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची ऊसाबाबतची संबंधित सुमारे ३०० कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना व्याजावर कर्ज घ्यावे लागत आहे. दरम्यान, जोपर्यंत थकीत बिले मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही अशी भूमिका भाकियूने घेतली आहे. आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंदोलनात सिंभावली ब्लॉक अध्यक्ष मुनव्वर अली, जिल्हा संरक्षक पी. के. वर्मा, जिल्हा सरचिटणीस कॅप्टन राजेश चौधरी, जिल्हा मीडिया प्रभारी अमजद खान, नौशाद अली, प्रदीप चौधरी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा नीलम त्यागी, जिल्हा सरचिटणीस ममता शर्मा, विनोद शर्मा, डॉ. उमेशकुमार राणा, अहमद अली, जाहिद खान, चौधरी इस्तेकर, सगीर अहमद आदींसह मोठ्या संख्येने कामगार व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here