बलरामपूर : जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सात वाजता सुरू झालेल्या जोरदार पावसाचा पिकांना चांगलाच फायदा झाला आहे. शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने आता शेतकरी भाताची पेरणी करू शकतील. जवळपास एक तासाहून अधिक काळ कोसळलेल्या पावसामुळे एकीकडे लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. तर अनेक ठिकाणी पाणी साठल्याने लोकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या एक महिन्यापासून भीषण उन्हामुळे शेतांमध्ये पुरेसा ओलावा नसल्याने ऊस व भाजीपाला पिके करपू लागली होती. गुरुवारी सकाळी तासभर चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे आनंदीत झाले. या पावसाने ऊस आणि भाजीपाला पिकाला जीवदान मिळाले आहे. शेतांमध्येही पुरेसा ओलावा आहे. त्यामुळे शेतकरी आगामी खरीप हंगामाची चांगली तयारी करू शकतील.
या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. हरिहरगंज बाजारपेठेतील रस्ते पाण्याखाली गेल्याची स्थिती होती. शहरातील तुलसी पार्क, खलवा, पुरबटोला, सिव्हिल लाइन, पहलवारासह तालुक्यात अनेक ठिकाणी लोकांना पावसामुळे दळणवळणाच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागले.