सुल्तानपूर : जिल्ह्यातील किसान सहकारी साखर कारखाना जुना झाल्याने उद्दिष्टांनुसार ऊस गाळप करू शकलेला नाही. या वर्षी आतापर्यंत आठ लाख दहा हजार क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. साखर कारखान्यांना ऊस पाठविणाऱ्या ६० टक्के शेतकऱ्यांना अद्याप बिले दिलेली नाहीत. सोमवारी साखर कारखान्यात पुन्हा बिघाड झाला. गाळप बंद झाल्यामुळे अखेरच्या टप्प्यात ऊस घेवून आलेल्या शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी आणलेला ऊस खरेदी केंद्रे आणि कारखान्याच्या गेटवरच वाळण्याचा धोका आहे. त्यामुळे नुकसानीत वाढ होईल.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, किसान सहकारी साखर कारखान्याला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा १६.५९ लाख क्विंटल ऊस गाळपासाठी देण्यात आला. मात्र, कारखाना जुना झाल्याने साडेदहा लाख क्विंटल ऊस गाळप उद्दिष्ट स्वीकारण्यात आले. यंदा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर अनेकवेळा कारखाना बिघाडामुळे बंद पडला. आतापर्यंत आठ लाख दहा हजार क्विंटल उसाचे गाळप झाले आहे. अद्याप एक लाख क्विंटलच्या तोडणी पावत्या जारी करण्यात आल्या आहेत. सोमवारी कारखाना बिघाडामुळे अनेक तास बंद राहिला. कारखान्याच्या सरव्यवस्थापकांनी सांगितले की, अद्याप एक लाख क्विंटलचे गाळप शिल्लक आहे. २० मार्चपर्यंत कारखान्याचा हंगाम सुरू राहाणार आहे. तर साठ टक्के उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप बिले मिळालेली नाहीत.