विभागातील ऊस पिकाला पोक्का रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. पिकाला या रोगांपासून वाचवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी कृषी तज्ज्ञांच्या भेटी घेत आहेत. रोगावर नियंत्रण न आल्यास उत्पादनावर परिणाम होईल, अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सध्या पोक्का बोईंगचा प्रादुर्भाव ०२३८ या प्रजातीच्या उसावर सर्वाधिक आहे. या जातीचा ऊस सिल्हारी, बराटेगदार, मोगर, बावट, हरिनाघाळा, भगवतीपूर, बलिया आदी गावांमध्ये पिकवला जातो. अशा स्थितीत येथील शेतकरी चिंतेत आहेत. पोक्का बोईंग रोगाचा फैलाव झाल्यास उसाचे पीक वाळते. उसाची पाने सुकून खाली पडतात. ज्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे, त्या ठिकाणी ऊस पिकाचा वरचा भाग करंड्यासारखा दिसू लागला आहे. ऊस उत्पादक शेतकरी दुर्गपाल सिंग, अशोक कुमार, मुनेंद्र कुमार, सचिन कुमार, अरविंद कुमार, अनिल, संतोष कुमार, पवन कुमार, रवेंद्र सिंह यांनी सांगितले की, सध्या उसाचे पीक पोक्का बोईंगच्या विळख्यात आहे. हा रोग रोखण्यासाठी ऊस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
दरम्यान, जिल्ह्यात जवळपास २१ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस पिक आहे. सालारपूर, गुलडिया आणि कादरचौक विभागात सर्वाधिक ऊस पिकवला जातो. पोक्का बोईंगचा फैलाव झाल्याचे दिसून आल्यावर सर्व ठिकाणचे शेतकरी चिंतीत झाले आहेत. सरकारने त्यावरील उपाययोजनेसाठी मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.