पिलिभीत : बजाज हिंदुस्थान साखर कारखान्याच्या बरखेडा विभागाच्यावतीने युनिट हेड एम. आर. खान यांनी डंडिया रांझे व भैसहा ग्वालपूर गावात ऊस लागवड कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शरद ऋतूत ऊस लागवड केल्यास जास्तीत जास्त फायदा मिळवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी पट्टा पद्धतीने ऊस लागवड करावी. उसामध्ये वाटाणे, बटाटे, मसूर आदी सहपिके घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले. ऊस लागवडीसाठी १५ ऑगस्ट ते ऑक्टोबर हा कालावधी योग्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
खान म्हणाले कि, उसाच्या रोगमुक्त बियाण्याचा वापर करावा. उसाचे रोगापासून संरक्षण करावे. कोएल १४२०१, को ११८, को ९८०१४ आणि कोएस १३२३५ या प्रजातींचा वापर करावा. शेतात खोल नांगरणी करून ट्रायकोडर्माचा वापर करावा, ऊस लागवडीवेळी १०० किलो युरिया, १३० किलो डीएपी आणि १०० किलो पोटॅश वापरावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी ऊस विभागप्रमुख सुबोध गुप्ता म्हणाले की, ऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना नवीन प्रजातींच्या ऊस बियाणांचा पुरवठा केला जाईल. शेतकऱ्यांना ट्रायकोडर्मा अनुदानावर उपलब्ध करून दिले जाईल, असेही ते म्हणाले. यावेळी साखर कारखान्याचे अधिकारी अखिलेश्वर उपाध्याय, डी. आर. सिंग, डॉ. डी. एन. शर्मा, बी. पी. यादव, अरविंद सिंग, किसन ओंकार, प्रेम शंकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.