अमरोहा : जिल्ह्याचे पालकमंत्री व ऊस राज्यमंत्री संजय सिंह गंगवार यांनी रविवारी अमरोहा सहकारी ऊस विकास समितीच्या कार्यालयात ऊस विकास तथा साखर उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विभागीय स्तरावरील कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला. गेल्या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १०० टक्के बिले अदा करावीत असे निर्देश यावेळी राज्यमंत्र्यांनी दिले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्र्यांनी बैठकीत २०२२-२३ या गळीत हंगामात धनौरा साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या ८६.५४ कोटी रुपये बिलांबाबत माहिती घेतली. जुलै महिन्यात ही शंभर टक्के रक्कम अदा केली जावी असे ते म्हणाले. विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या योजनांचा व्यापक प्रचार-प्रसार करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. शेतकऱ्यांना नियमांनुसार लाभ मिळावा यासाठी उद्दिष्टपूर्ती करावी, गळीत हंगाम २०२३-२४ मधील गाव स्तरावरील सर्व्हे आणि नोंदणीच्या सादरीकरणाची स्थिती पडताळणी करावी, खड्डेमुक्त रस्ते अभियानांतर्गत रस्त्यांच्या निर्मितीचे काम गुणवत्तापूर्ण केले जाईल, निकष पाळले जातील याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले.