महराजगंज: आगामी गळीत हंगाम २०२३-२४ साी जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्राचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. हे ऊस सर्वेक्षण १५ जूनपर्यंत सुरू राहाणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही जुन्या शेतकऱ्यांसह ऊस शेती नव्याने करणाऱ्या शेतकऱ्यांच्याही स्वतंत्र नोंदी घेतल्या जाणार आहेत. नव्या शेतकऱ्यांना ऊस समित्यांशी जोडण्यासाठी ऊस विभागानेही तयारी सुरू केली आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस तथा साखर आयुक्तांनी २०२३-२४ या हंगामासाठी जिल्ह्यातील संभाव्य उत्पादनाचा आढावा घेण्यासाठी सर्व्हेचे निर्देश दिले आहेत. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनानुसार, ऊस विभागाने यासाठी खास तयारी केली आहे. या काळात गावागावात मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. त्यातून नव्या शेतकऱ्यांना ऊस समित्यांशी जोडले जाईल.
मात्र, जे शेतकरी सदस्य बनणार नाही, त्यांना ऊस पुरवठाविषयक सुविधा मिळणार नाहीत. नव्या शेतकऱ्यांना सर्व्हेबरोबरच आधार कार्ड, बँक पासबुक, सुविधा केंद्रांकडून मिळणारा महसूल उतारा द्यावा लागेल. यावेळी वेबसाइटवर मोबाईल क्रमांकही नोंदवला जाणार आहे. जिल्हा ऊस अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी सांगितले की, ऊस आयुक्तांच्या निर्देशानुसार, सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले आहे. ऊस विभागाची पथके शेतकऱ्यांचा सर्व्हे करतील. नव्या शेतकऱ्यांना समित्यांशी जोडून घेतले जाईल.