मिर्जापूर : भाताप्रमाणे यंदा गहू खरेदीस गती आलेली नाही. एक एप्रिलपासून सुरु झालेल्या योजनेत आतापर्यंत पाच मे पर्यंत, जिल्ह्यातील विविध केंद्रांवर १,६७४ शेतकऱ्यांकडून फक्त ७,०८२.१० एमटी गव्हाची खरेदी झाली आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी समान कालावधीत ३,०९२ शेतकऱ्यांकडून ११,८२९.७२ एमटी गव्हाची खरेदी करण्यात आली होती. यंदा धिम्या गतीने सुरू असलेल्या खरेदीमुळे एजन्सींच्या अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विभागात सदर, चुनार, मडिहान व लालगंज तालुका क्षेत्रात अन्न महामंडळ, पीसीएफ, पीसीयू, यूपीएसएस, नाफेड, मंडी समिती व भारतीय अन्न महामंडळ अशी एकूण ७५ गहू खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यापैकी एक केंद्र वगळता इतरत्र खरेदी सुरू आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही जिल्ह्यास ७२,००० एमटी गहू खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, सद्यस्थितीत अन्न विभागातर्फे ११५२० एमटीच्या तुलनेत १२ केंद्रांवर ३,१४१ एमटी गहू खरेदी झाली आहे. याबाबत डेप्युटी आरएमओ धनंजय सिंह यांनी सांगीतले की, शासनाच्या निर्देशानुसार, मोबाईल खरेदी टीम सुरू केल्या आहेत. त्यामुळे अपेक्षित परिणाम दिसू लागले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उद्दिष्टपूर्ती होईल, अशी अपेक्षा आहे.