शामली : यंदा जिल्ह्यात साखर कारखान्यांच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार कार्यक्षेत्रातील ऊस लागवडीत सुमारे अडीच हजार हेक्टरची घट होईल असे अनुमान आहे. कारखान्यांच्यावतीने ऊसाची सर्वेक्षण प्रक्रिया या आठवडाअखेर पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर याबाबत अधिक स्पष्टता दिसून येईल.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार शामली जिल्ह्यात अंबाला-शामली आणि दिल्ली-डेहराडून ग्रीन फिल्ड इकॉनॉमी कॉरिडोर आणि हायवे आणि बायपास मार्गालगत विकसित झालेल्या निवासी कॉलन्यांमुळे ऊस लागवड क्षेत्रात घट झाल्याचे दिसून आले आहे. थानाभवन आणि शामली या दोन कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात मुख्यत्वे ही घट झाली आहे. ऊस विभागाच्यावतीने २० जूनपर्यंत सर्व कारखाने आणि ऊस विभागाच्या पथकांना लागवड क्षेत्राचा सर्व्हे करण्याचे निर्देश होते.
जिल्ह्यात शामली, थानाभवन आणि ऊन कारखान्याच्या संयुक्त पथकांनी सर्वेक्षण केले आहे. शामली कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हायवे आणि बायपासनजीकच्या निवासी कॉलन्यांमुळे ऊस क्षेत्र कमी झाले आहे. थानाभवन कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अंबाला-शामली आणि दिल्ली-डेहराडून इकॉनॉमिक एक्स्प्रेस वे मुळे कार्यक्षेत्रातील वीस हजार हेक्टरपैकी १८ हजार हेक्टरचे सर्वेक्षण झाल्याचे सरव्यवस्थापक दीपक राणा यांनी सांगितले. थानाभवन कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक लेखपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४१ गावांत २४,५०० हेक्टरपैकी २४ हजार हेक्टरमध्ये सर्व्हे झाला आहे. येथे ५०० हेक्टरमधील ऊस क्षेत्र घटले आहे. ऊन कारखान्याच्या कार्यक्षेत्रातही २०० हेक्टरने ऊस क्षेत्र कमी झाले आहे. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह म्हणाले की, सर्वेक्षण शनिवारपर्यंत पूर्ण होईल.