बिजनौर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये ऊसाचा गोडवा वाढला आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या ऊस सर्व्हेनुसार आतापर्यंत जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्र वाढले आहे. अद्याप जिल्ह्यातील पाच टक्के ऊस सर्व्हे शिल्लक आहे. तो पूर्ण झाल्यानंतर एकत्रित चित्र समोर येवू शकेल.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गळीत हंगाम समाप्त होताच साखर कारखान्यांनी आगामी हंगामाची तयारी सुरू केली आहे. साखर कारखान्यांमध्ये देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू आहे. ऊस विभाग सर्व्हे करीत आहे. जिल्ह्यातील ९५ टक्के सर्व्हे पूर्ण झाला आहे. गेल्यावर्षीच्या गळीत हंगामात दोन लाख ५५ हजार हेक्टरमध्ये ऊस पिक लावण्यात आले होते. आता हे क्षेत्र २ लाख ५७ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत सर्व्हे पूर्ण होईल.
जिल्ह्यात जवळपास ९९ टक्के क्षेत्रात ०३३८ प्रजातीच्या उसाची लागवड करण्यात आली आहे. या प्रजातीचे उत्पादन चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे कीड, रोगांवर नियंत्रण मिळवून शेतकऱ्यांनी या प्रजातीची लागवड केली आहे. जिल्ह्यात नऊ कारखाने आहेत. आणखी एकाची उभारणी सुरू आहे. कारखान्यांनी गेल्या हंगामात उच्चांकी १२ कोटी ४३ लाख ४३ हजार क्विंटल उसाचे गाळप केले. त्याआधीच ११ कोटी ५९ लाख क्विंटल ऊस गाळप करण्यात आले होते. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन हजार हेक्टरमध्ये ऊस क्षेत्र वाढल्याचे जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी सांगितले.