गोंडा : मैजापूर साखर कारखान्याच्या इथेनॉल प्लांटमध्ये काम करताना ड्रायरच्या पंख्यात एक कामगार अडकला. कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीने ड्रायर बंद केला. मात्र, तोपर्यंत या कामगाराचा चिरडून मृत्यू झाला. चेन्नईतील थ्रायल कंपनीचे ठेकेदार आलोक श्रीवास्तव यांच्या कंपनीचे शंभरहून अधिक कामगार कारखान्याच्या इथेनॉल प्लांटमध्ये काम करतात. यात बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया गावचा रहिवासी अनिल सिंग (३०) हा देखील काम करत होता. शनिवारी सायंकाळी पाच वाजता काम करताना तो ड्रायर फॅनमध्ये अडकला. ड्रायर बंद करेपर्यंत अनिलचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कटरा बाजार पोलिस स्थानकाचे निरीक्षक मनोज कुमार राय घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
अमर उजालामधील वृत्तानुसार, हलधरमाळ येथील मैजापूर येथील हा इथेनॉल प्लांट बलरामपूर शुगर मिल ग्रुपचा असल्याचे सांगण्यात येते. या घटनेची माहिती कामगार कंत्राटदार आलोक श्रीवास्तव यांनी पोलीस ठाण्यात दिली. तर साखर कारखान्याचे कामगार कल्याण अधिकारी सौरभ गुप्ता यांनी सांगितले की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मजुराच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत दिली जाईल.