पुणे : २०२३-२४ च्या गाळप हंगामात साखर कारखाना परिसरात वास्तव्यास येणारे ऊसतोड कामगार, महिला आणि त्यांच्या मुलांसाठी मुलभूत प्राथमिक सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी परिपत्रकान्वये दिले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची माहिती ‘महा-ऊस-नोंदणी’ ॲपमध्ये अपलोड करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
परिपत्रकात पुढे म्हटले आहे कि, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या मदतीने उसतोड मजुरांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. सर्व कारखान्यांनी गाळपासाठी ऊस नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी साखर आयुक्तालयातर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘महा-ऊस-नोंदणी’ ॲपमध्ये ऑनलाईन अपलोड करावी. त्याचबरोबर कारखान्यांनी ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार आणि ऊसतोड यंत्रधारकांची माहिती वाहतूकदार व्यवस्थापन ॲपमध्ये भरावी, अशा सूचनाही डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या आहेत.
तक्रार निवारण अधिकारी नेमणुकीचे आदेश…
गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उसतोड मजूर, वाहतूकदार तसेच कारखाना कर्मचारी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी साखर आयुक्त कार्यालयाकडे दाखल होतात. अशा तक्रारी आगामी हंगामात शेतकऱ्याकडून येऊ नयेत, त्यांची पिळवणूक होऊ नये यासाठी कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी दिली आहे.