मनिला : अमेरिकेने साखरेवर लादलेला १८ टक्के कर सध्या चिंतेचा विषय नाही, असे शुगर नियामक प्रशासनाचे (एसआरए) प्रशासक पाब्लो लुईस अझकोना यांनी सांगितले. ते म्हणाले, पूर्वी हा दर १० टक्के होता आणि आता परस्पर दर १७ टक्क्यांऐवजी १८ टक्के निश्चित करण्यात आला आहे. अमेरिका कृषी विभागाच्या वेबसाइटवर स्पष्ट केले आहे की, हा आयातदार शुल्काचा भार अमेरिकेने उचलला आहे. अमेरिकन खरेदीदारांनी फिलीपाइन्सच्या निर्यातदारांना ते त्यांच्याकडून शुल्क घेणार असल्याबाबत माहिती दिलेली नाही, असे अझकोना म्हणाले.
अझकोना म्हणाले की, ते अजूनही अमेरिकन दूतावासातील कृषी व्यवहार कार्यालयाचे कृषी सल्लागार मायकेल वॉर्ड यांच्या उत्तराची वाट पाहत आहेत. ज्यामध्ये त्यांनी शुल्क वाढीबद्दल चौकशी केली आहे. गेल्या आठवड्यात फिलीपाइन्स साखर निर्यातदारांनी नवीनतम दरांबद्दल चिंता व्यक्त केली. अझकोना म्हणाले की, फिलीपाइन्सने (ज्याचा अमेरिकेच्या साखर कोट्यात १४३,००० मेट्रिक टन वाटा आहे) २०२४-२०२५ या पीक वर्षासाठी अमेरिकेला निर्यात करण्यासाठी ६६,२३५ मेट्रिक टन कच्ची साखर वाटप केली आहे. फिलीपाइन्स त्यांच्या वाटपाचा पहिला भाग मे महिन्यात आणि दुसरा भाग जूनमध्ये पाठवत आहे, असे त्यांनी सांगितले. अझकोना म्हणाले की, अमेरिकन आयातदारांसोबतच्या निर्यातदारांच्या करारांमध्ये ते शुल्क भरतील, असे नमूद केलेले नाही.
तर नॅशनल फेडरेशन ऑफ शुगरकेन प्लांटर्सचे अध्यक्ष एन्रिक रोजास आणि कॉन्फेडरेशन ऑफ शुगर प्रोड्यूसर्स असोसिएशनचे प्रमुख ऑरेलियो गेरार्डो वाल्डेरामा ज्युनियर यांनी सांगितले की, अझकोना यांना वॉर्डकडून प्रतिसाद मिळेपर्यंत ते दरांवर भाष्य करण्यास टाळाटाळ करत आहेत. आम्ही प्रतिक्रिया देण्यापूर्वी, या अमेरिकेच्या नवीन निर्देशांतर्गत फिलीपाइन्स साखर निर्यातीच्या व्याप्तीबद्दल स्पष्टीकरण मागणाऱ्या एसआरएच्या पत्राला अमेरिकेच्या प्रतिसादाची वाट पाहणे चांगले, असे रोजास म्हणाले. तर आम्ही अजूनही या विषयावर डीए आणि एसआरएच्या सल्ल्याची वाट पाहत आहोत, असे वाल्डेरामा यांनी स्पष्ट केले.