नवी दिल्ली : भारत-अमेरिका यांदरम्यान, व्यापार धोरण फोरमची (टीपीएफ) बारावी मंत्रिस्तरीय बैठक झाली. यावळी अमेरिकेने २०२५ पर्यंत भारताच्या २० टक्के इथेनॉल मिश्रण धोरणाचे समर्थन केले. यासोबतच अमेरिकेने भारताला इथेनॉल पुरवठा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी, राजदूत कॅथरीन ताई यांच्या सह अध्यक्षतेखाली टीपीएफची बैठक झाली. या बैठकीत अमेरिकेने भारताच्या इथेनॉल मिश्रण धोरणाचे कौतुक केले.
दोन्ही मंत्र्यांनी इथेनॉल मिश्रण कार्यक्रमात सहयोग वाढविण्याच्या संधी शोधण्याबाबत सहमती व्यक्त केली. भारत आणि अमेरिकेने भविष्याात अनेक क्षेत्रात भागिदारीत काम करण्यावर सहमती व्यक्त करण्यात आली. टीपीएफच्या बैठकीवेळी अमेरिकेने तपासणी यंत्रे कमी दरात उपलब्ध करून देण्याच्या भारताच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. दोन्ही मंत्र्यांनी आपापल्या देशांतील कुशल कर्मचारी, विद्यार्थी, गुंतवणूकदार आणि व्यापारी प्रवाशांच्या ये-जा करण्याबाबतच्या मुद्यांवर चर्चा केली. लसीकरण केलेल्या नागरिकांच्या प्रवासाला परवानगी देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले आहे.