नवी दिल्ली : कच्च्या तेलाबाबत (क्रूड) अमेरिका आणि युरोपिय देशांनी दबाव आणूनही भारतावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. सरकारी तेल कंपन्यांसह खासगी क्षेत्रानेही रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे. रशिया-युक्रेन संकटानंतर आयटीसह काही इतर क्षेत्रातील खासगी कंपन्या पाश्चिमात्य देशांवर अवलंबून असल्याने रशियासोबतचा आपला व्यवसाय थांबवत आहेत. रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार रिलायन्स इंडस्ट्रिजने मोठ्या प्रमाणावर रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याचा करार केला आहे. अहवालानुसार, भारतीय कंपन्या रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवत आहेत. त्यांना कच्चे तेल खूप स्वस्त मिळत असल्याने आणि सोप्या अटींवर मिळत आहे.
याबाबत टीव्ही९हिंदी डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार रॉयटर्सने तेल व्यवसायातील सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिजने रशिया-युक्रेन संकटादरम्यान १.५ कोटी बॅरल तेल रशियाकडून खरेदी केले आहे. सुत्रांनी सांगितले की, जूनच्या तिमाहीत म्हणजे एप्रिल, मे आणि जून महिन्यासाठी प्रती महिना ५० लाख बॅरल तेल खरेदी करण्यात आले आहे. रॉयटर्सने म्हटले आहे की, रिलायन्स बाहेरून क्वचित तेल खरेदी करतो. कारण, भारतापासून लांब असल्याने त्यांना पुरवठा महागड्या दराने होतो. आता पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लागू केल्याने रशियातील व्यावसायिकांकडून कमी अटींवर आणि मोठ्या सवलतीच्या दरात तेल मिळत आहे. ५ एप्रिल ते ९ मे या काळात रिलायन्सने एकूण ९० लाख बॅरल तेलाचे काँट्रॅक्ट केले आहे. रिलायन्सची जामनगर येथील रिफायनरी दररोज १४ लाख बॅरल तेलावर प्रक्रिया करते.