कोल्हापूर : आगामी काळात ऊस उत्पादनात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यात असल्याचा कल दिसून आला आहे. शेतकरी सॅटेलाइट मॅपिंग, अत्याधुनिक सेन्सर प्रणाली, एआय, हायपरस्पेक्टरल कॅमेऱ्याचा वापर जसजसा सुरू करतील, तसतसा त्याचा फायदा उत्पादन वाढीला होणार आहे. शास्रीय व्यवस्थापनामुळे ऊस उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ आणि खर्चात बचत शक्य आहे.
शेतीसाठी सॅटेलाइट मॅपिंगद्वारे उपलब्ध होणाऱ्या जमिनीतील अन्नद्रव्यांची अचूक माहितीमुळे कमतरता भरून काढण्यास मदत होईल. तसेच पिकात लावलेल्या अत्याधुनिक सेन्सर प्रणाली मातीचा सामू, क्षारता, ओलावा, नत्र, स्पुरद, पालाश व हवामानातील माहिती वेळीच उपलब्ध होईल. एआयचा पाणी, खत वापर आणि कीड व रोग नियंत्रणासाठी मदत होईल. हाय परस्पेक्ट्रल कॅमेऱ्याद्वारे पिकाचे नियमित निरीक्षण करून आवश्यक तिथेच खते व कीडनाशके यांचा वापर शक्य आहे. खतांच्या योग्य वापरामुळे सुपिकतेमध्ये वाढ होईल. याचबरोबर पिकाची अचूक वेळी काढणी केल्यामुळे अपेक्षित वजन व जादा साखर उतारा मिळविण्यासाठीही फायदा होणार आहे.
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने जागतिक संस्थांच्या सहयोगाने विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित काटेकोर शेती तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढीची संधी कारखान्यांना मिळणार आहे. याशिवाय, साखर उताऱ्यातही लक्षणीय वाढ शक्य आहे. परवडणाऱ्या ऊस शेतीसाठी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट, ऑक्स्फर्ड विद्यापीठ व ॲग्री पायलट एआय या जागतिक संस्थांच्या सहयोगाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित काटेकोर शेती तंत्रज्ञान विकसित केले आहे. साखर कारखान्यांच्या ऊस विकास विभागांसाठीही हे तंत्रज्ञान खुले केले जाणार आहे.