साखर कारखानदारीत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर: कोल्हे साखर कारखान्याचा ‘महिंद्रा अँड महिंद्रा’सोबत करार

अहिल्यानगर :संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी कोल्हे सहकारी साखर कारखाना नवनवे बदल आत्मसात करीत आहे. कारखान्याने महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीशी करार केला असून याद्वारे उपग्रह आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा(ए.आय.)प्रभावी वापर कारखान्याच्या कामकाजात केला जाणार आहे.अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरणारा कोल्हे कारखाना देशातील पहिला साखर कारखाना ठरल्याचा दावा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केला आहे.कारखान्याने २०२३-२४ या गळित हंगामात ७ लाख ९ हजार ११२ मे.टन ऊस गाळप करत १०.५९ टक्के साखर उतारा मिळविला आहे.

अध्यक्ष कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करत देशातील साखर उद्योगास सातत्याने मार्गदर्शन केले.आता कारखान्यातर्फे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीशी करार करून उपग्रहाद्वारे ऊस प्लॉटचे मापन, मल्टीस्पेक्ट्रम कॅमेऱ्याच्या सहाय्याने ऊस पिकातील हरितद्रव्य पृथक्करण करून शेतात उभ्या असलेल्या ऊसाची साखर उतारा तपासणी केली जाते. हवामान घटकांचा देखील उपग्रहाच्या सहाय्याने अभ्यास केला जातो.कृत्रिम बुद्धीमत्तेचे (एआय) मॉडेल वापरून या सर्व माहितीचे पृथक्करण केले जाते.दर आठवड्याला त्यातील निष्कर्ष कारखान्याच्या प्रयोगशाळेत फेरपडताळणी करून ऊस तोडणी कार्यक्रम राबवला जातो.यातून खर्चात बचत करून ०.२ टक्के अधिक साखर उतारा मिळाला आहे.कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, केन मॅनेजर जी. बी. शिंदे, ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, महिंद्रा कंपनीचे करमयोग सिंग, मंदार गडगे, सुमित दरफले, किरण किर्दक आदींची टीम या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी प्राधान्याने अंमलबजावणी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here