कोल्हापूर : कोपार्डे (ता. करवीर) येथील प्रगतशील शेतकरी अरुण निंबाळकर यांनी कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या बॉयलरमधून बाहेर पडणारी राख स्वतःच्या माळरानावरील शेतीत वापरून उत्पादनात वाढ केली आहे. त्यामुळे शेतीसाठी कारखान्याची राख खत म्हणून वरदान ठरू शकते असे दिसून आले आहे. सध्या त्यांच्या शेतात सुमारे ४२ ते ४७ पेरांचा ऊस आहे. एकरी १२० टन उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याबाबत निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याने निंबाळकर यांच्या शेतावर राख पसरून दिली. त्यावर त्यांनी वेळोवेळी हलकी नांगरट करुन शेत तयार केले. निंबाळकर यांनी राखमिश्रीत जमिनीवर जूनमध्ये को ८६०३२ या जातीच्या ऊसाची लागण केली. आता येथे १८ महिन्यांचा ऊस उभा आहे. ऊस तोडणी सुरू असून या उसाला ४२ ते ४७ पेरे आहेत. एकूण १२० टन उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी कुंभी कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके व तत्कालीन कार्यकारी अधिकारी चिटणीस यांनी प्रोत्साहन दिल्याचे सांगण्यात आले. कार्यकारी संचालक धीरज कुमार माने, सेक्रेटरी प्रशांत पाटील, सिव्हिल इंजिनियर सरदार पाटील, कुंभी पर्यावरण विभाग जाधव, सरदार पाटील आदी तोडणीवेळी उपस्थित होते.