उसतोड मजुराचा मुलगा बनला महसूल सहायक अधिकारी

कोल्हापूर : आपल्यासमोर कितीही अडचणी आल्या तरी परिश्रम आणि कष्टात सातत्य ठेवल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नसते, हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडीच्या इंद्रजीत अनिल डिग्रजकर या ऊसतोड मजुराच्या मुलाने दाखवून दिले आहे. घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची असताना इंद्रजीतने मिळवलेले यश सर्वसामान्य मुलांसाठी प्रेरणादायी असेच आहे.

उसतोड मजूर असणाऱ्या अनिल डिग्रजकर यांनी दारिद्र्याशी लढा देत आपल्या मुलांना अगदी जिद्दीने शिक्षण दिले. त्यामध्ये त्यांना अनंत अडचणींचा सामनाही करावा लागला. पण अडचणीमुळे ते कधी डगमगले नाहीत. जेंव्हा त्यांचा मुलगा मंत्रालयात अधिकारी झाल्याची बातमी त्यांच्या कानावर पडली तेव्हा त्यांच्या आयुष्यात गोडवा निर्माण झाला. इंद्रजीत राज्यसेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात राज्यात २८ वा क्रमांक मिळवत महसूल सहायक अधिकारीपदी विराजमान झाला.

अनिल आणि त्यांची पत्नी सुरेखा यांना दोन मुले आहेत. अनिल हे उसतोड मजुर म्हणून काम करून प्रपंच चालवतात. हे करत असताना त्यांच्या पायाला दुखापत होऊन तो पाय कायमचा निकामी झाला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातून जिद्दीने उभा राहत अनिल यांनी मुलांना शिक्षण दिले. त्यातील एका मुलाने मालवाहतुकीचा व्यवसाय करत वडिलांना हातभार लावला तर आता इंद्रजीतने महसूल सहायक अधिकारी पद मिळवत आई- वडिलांच्या कष्टाला न्याय मिळवून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here