शहाजहानपूर : उत्तर प्रदेशातील तीनशे शेतकरी संघटना एकत्र येऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलासाठी लढा देतील, अशी घोषणा भारतीय किसान युनियनच्या चढूनी गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी केली. सोमवारी डाक बंगला संकुलात शेतकऱ्यांच्या बैठकीला संबोधित केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मेरठमध्ये झालेल्या बैठकीत उत्तर प्रदेशमधील सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून संयुक्त किसान क्रांती मोर्चाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी संघटना वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्वतंत्र संघर्ष करतात. त्यामुळे त्या कमकुवत राहतात आणि त्याचा फायदा सरकार घेते, पण आता असे होणार नाही. असे ते म्हणाले.
सरकारी नियमानुसार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १४ दिवसांत पैसे न दिल्यास कारखान्याने ते व्याजासह द्यायला हवेत. मात्र राज्यातील सर्व साखर कारखानदार एक वर्षानंतर उसाचे पैसे व्याजाविना देतात. कारखानदार केवळ व्याजात सुमारे ७०० कोटी रुपये वाचवतात. शेतकऱ्यांना खर्चासाठी सावकाराकडून व्याजावर तेवढीच रक्कम घ्यावी लागते असे सांगून गुरनाम सिंग म्हणाले की, ज्या साखर कारखान्यांची थकबाकी आहे, तेथे पंचायत कर भरण्यासाठी प्रयत्न केले जातील. जर याबाबत चर्चा झाली नाही तर ३० जानेवारी रोजी बुलंदशहर येथे संयुक्त किसान क्रांती मोर्चाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल. यावेळी ‘भाकियू’चे राष्ट्रीय सरचिटणीस मनोज नागर, पश्चिम उत्तर प्रदेशचे राज्य प्रभारी सुबेसिंग डागर, तराई प्रदेश प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंग खिंडा, प्रदेश सचिव भूपेंद्र सिंग गिल, शिशुपाल सिंह यादव, केशव प्रसाद सोळंकी, रणजितसिंग काहलो, बलकार सिंग, सुनील सिंग यादव, भरतसिंग, संजय मिश्रा, सौदान सिंग यादव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.