लखनौ : उत्तर प्रदेशात डिस्टिलरीज आणि बिअर प्लांट उभारण्यासाठी जगभरातील मोठ्या कंपन्या दाखल झाल्या आहेत. नवीन उत्पादन शुल्क धोरणामुळे, उत्तर प्रदेश इथेनॉलसह बिअर, वाईन आणि दारूच्या उत्पादनात आणि निर्यातीत पहिल्या क्रमांकाचे राज्य असेल असे सरकारचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षांत ५०० हून अधिक मोठ्या ब्रँड्सनी राज्यात नोंदणी केली आहे. तर २५ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा आहे. राज्य देशातील एक डिस्टिलरी हब म्हणून उदयास येत आहे असे उत्पादन शुल्क मंत्री नितीन अग्रवाल यांनी सांगितले.
‘अमर उजाला’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, उत्पादन शुल्क मंत्री म्हणाले की, राज्य सरकारच्या औद्योगिक धोरणांमुळे आकर्षित होऊन, मोठ्या कंपन्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या राज्यांपेक्षा उत्तर प्रदेशला प्राधान्य दिले आहे. ते येथे गुंतवणूक करत आहेत. पूर्वांचलमध्ये मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. बुंदेलखंडमध्ये अनेक कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
केयन डिस्टिलरीने गोरखपूर औद्योगिक विकास प्राधिकरणात सुमारे १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. येथे ८० एकर जमिनीवर धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट उभारला जाईल. एक डिस्टिलरी देखील उभारली जाईल. भूमिपूजन समारंभात सुमारे २०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारल्या जाणाऱ्या १३ डिस्टिलरी प्लांटपैकी बहुतेक प्लांट लहान शहरांमध्ये आहेत. टॉप टेन मोठ्या प्रकल्पांमध्ये, बरेलीमध्ये दोन, शाहजहानपूरमध्ये दोन, देवरिया, अमरोहा, रामपूर, लखीमपूर खिरी, गोरखपूर आणि सीतापूरमध्ये प्रत्येकी एक डिस्टिलरी प्लांट उभारले जात आहेत.