बुलंदशहर : जिल्ह्यात उसाचे बंपर पिक उपलब्ध असून त्यामुळे ऊस माफिया सक्रिय झाले आहेत. त्यांनी बुलंदशहर जिल्ह्यातील ऊस कमी दरात खरेदी करून इतर जिल्ह्यांत विक्री सुरू केली आहे. येथील शेतकऱ्यांच ऊस शेजारील जिल्ह्यात जात असल्याचे जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून पकडलेल्या उसाच्या ट्रॉलीतून उघड झाले आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अमरोहा, अलीगढ, संभल आणि आग्र्यासह उत्तर प्रदेशातील पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये येथून ऊस पुरवठा केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी आता पथके तयार केली आहेत. ही पथके उसाचा काळाबाजार रोखतील. सीमावर्ती जिल्ह्यात जवळपास ७३ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात उसाचे पीक घेण्यात आले आहे. बुलंदशहरच्या चार साखर कारखान्यांव्यतिरिक्त शेजारील जिल्ह्यातील कारखान्यांनाही ऊस पुरवठा केला जातो. मात्र हे माफिया शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांचा ऊस कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत. तो इतर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना विक्री केला जात आहे. जिल्ह्यातील पथके अशा उसाचा काळाबाजार रोखतील असे जिल्हा ऊस अधिकारी बी. के. पटेल यांनी सांगितले. जिल्ह्यात उसाची उचल वेळेवर होत नसल्याने असे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.