संत कबीर नगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या दुर्लक्षामुळे ऊस खरेदी केंद्रांवर अनागोंदीची स्थिती आहे. गेल्या चार दिवसांपासून शेतकरी धनघटा येथील दोन खरेदी केंद्रावर ऊस घेऊन थांबले आहेत. उसाची वेळेत उचल होत नसल्याने वजन घटण्याची भीती असल्यामुळे शेतकरी संतप्त बनले आहेत. याबाबत धनघटा येथील दोन केंद्रांसह पायलपार येथील खरेदी केंद्रांचा खलीलाबाद येथील सहकारी ऊस विकास समितीचे सचिव बी. एस. दीक्षित यांनी आढावा घेतला. यावेळी धनघटा येथील शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
हिंदूस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, ऊस खरेदीबरोबरच त्याची वेळेत उचल करण्याची जबाबदारीही साखर कारखान्याची आहे. मात्र धनघटा येथील दोन्ही खरेदी केंद्रावर ५० हून अधिक उसाच्या ट्रॉल्या उभ्या आहेत. कडाक्याच्या थंडीत उसाची उचल संथ आहे. त्यामुळे वजन करण्याचे कामही रखडले आहे. शेतकरी जयराम चौधरी यांनी सांगितले की, दोन दिवस उलटूनही उसाचे वजन झालेले नाही. दोन्ही खरेदी केंद्रांवर गोंधळाची स्थिती आहे. या स्थितीला साखर कारखानदार जबाबदार आहेत. दरम्यान, समितीच्या सचिवांनी सांगितले की, याबाबत साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला आहे. लवकरात लवकर उसाची उचल करण्याचे प्रयत्न आहेत. बस्तीच्या जिल्हा ऊस अधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या स्तरावरही पत्रव्यवहार करण्यात आला आहे.